मे १०, २००९

ह्या आधी:
भटकंती (ठाणे ते शेगाव)
भटकंती (शेगाव- आनंदसागर)
शनिवारी सकाळी पुन्हा मंदिरात जायचे होते दर्शनाला. साधारण ८ वाजता तयार होऊन आम्ही निघालो. विचार केला होता की दर्शन घेऊन तसेच थेट निघता येईल. म्हणून मग सर्व सामान गाडीत ठेवले व हॉटेलची खोली सोडून दिली. आम्ही असलेली जागा ही मंदिराच्या पश्चिम द्वारासमोर होती. ते द्वार सध्या दुरूस्तीकरीता बंद होते. त्याच्याच उजव्या बाजूनेही दुसरे आणखी एक प्रवेश द्वार होते. त्यातून आम्ही आत गेलो. (रात्रीही ह्याच मार्गाने गेलो होतो, पण आता थोड्या जास्त माहितीसोबत)

दर्शन घेतल्यावर आम्ही थोडा वेळ मंदिराच्या आवारात बसलो होतो. तिथेच स्वागत कक्ष, देणगी केंद्रे बनविली आहेत एका बाजूला पोथी वगैरेचे पारायण करण्याकरीताही एका हॉलमध्ये सोय केली आहे. तशाच आणखीही सोयी आहेत. मंदिराच्या आसपासच्या भागात म्हणजे खालील फोटोत दिसणार्‍या द्वारातून आत गेले की पूर्ण भागात कॅमेरा वापरण्यास बंदी होती, त्यामुळे बाहेरील भागात जमतील तशी चित्रे कॅमेर्‍यात बंदिस्त केली (अर्थात संस्थानाच्या कार्यकर्त्यांच्या परवानगीनेच). त्यामुळे गजानन महाराजांच्या मूर्तीचा फोटो वगैरे ह्यात नाही.

ह्या द्वारातून आम्ही आत आलो.

हे संस्थानाचे सभागृह,

आजूबाजूच्या आवारातही इतर लहान मंदिरे बांधलेली आहेत.




शेगाव संस्थानाचे भक्त निवास क्र १. इथेही अशाच प्रकारे इतर निवासस्थाने क्र २ ते ६ बनविली आहेत.

हे मुख्य प्रवेशद्वार (आतून). ह्या प्रवेशद्वारापर्यंत येण्याची गाडी, रिक्षा ह्यांना परवानगी आहे. ह्यापुढे चालतच जायचे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर फुल/प्रसाद व इतर साहित्याची दुकाने आहेत.



हे सर्व पाहताना एक जाणवले की मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत सगळीकडे चांगली स्वच्छता पाळली गेली आहे. असेच आनंदसागर येथेही अनुभवले होते.

मंदिरातून निघून मग आम्ही मुख्य मंदिरापासून ६/७ कि.मी अंतरावर असलेल्या नागझरी ह्या ठिकाणी जायला निघालो. तेथे जाण्याचा रस्ता जाणीव करून देत होता की आपण एखाद्या खेडेगावातून जात आहोत. लहान रस्ता, आजूबाजूला घरे. रस्त्यावरून ऊस वाहून नेणाया बैलगाड्या. एखादी गाडी समोर असली की त्याला सहज पार करून जाणे अशक्य. दोघांनीही एकमेकांकरीता रस्ता मोकळा करून द्यायचा. गावातून बाहेर निघालो तर एकदम निर्जन, ओसाड वाटणारा प्रदेश. पण शेतीकरीता वापरला जाणारा असेल असा अंदाज. रस्ता एकदम खडबडीत.


आम्ही नागझरीला पोहोचलो. तिथे गेल्यावर कळले की येथे गजानन महाराजांच्या गुरूंचे मंदिर आहे. तिथे बाहेरच मोठे प्रवेशद्वार बनविले आहे. आम्ही त्या प्रवेशद्वारातून न जाता उजवीकडील वेगळ्या रस्त्याने खालपर्यंत गाडी घेऊन गेलो व तिकडून दुसर्‍या पायर्‍या उतरलो.


आत एक पाण्याचे कुंड बनविले आहे जिथे गायीच्या तोंडातून पाण्याचा उगम आहे. पुढे मंदिराच्या वरच्या भागात एक मंदिर आहे (कोणाचे ते आठवत नाही) तिकडून खाली उतरल्यावर गुहेत आत गेल्याप्रमाणे पायर्‍या बनविल्या आहेत व तिथे गुरूंचे मंदिर आहे. (पुन्हा त्या मूर्तीचा फोटो घेण्यास मनाई)

खाली उतरल्यावर पाहिले की प्रसाद (जेवण) बनविण्याकरिता तेथे एक मोठे स्वयंपाकघर बनविले आहे. आणि दुसर्‍या खोलीत भांडी ठेवण्याची व्यवस्था आहे. तिकडची भांड्यांची मांडणी एकदम पद्धतशीर होती, ते मला एवढे वेगळे वाटले आणि आवडले की मी त्याचा फोटो घेणार होतो, पण तेथील मुख्य असलेल्या व्यक्तीने (काय संबोधन होते तेही विसरलो आता) नकार दिल्याने तो विचार सोडून दिला.

तेथून मग आम्ही अंदाजे ११:४५ ला निघालो. पुन्हा शेगावच्या मंदिराजवळ आलो. तिथे ११ ते १ महाप्रसाद मिळतो. मी रांगेत लागून तो प्रसाद घेतला, व पुढे मग जेवणाकरीता हॉटेल शोधत निघालो. शेगावच्या बाहेर निघताना एक चांगले हॉटेल दिसले. रात्री जेवलेल्या हॉटेलपेक्षा हे भरपूर चांगले होते, आणि त्याच्या थोडेच पुढे होते. त्यामुळे काल रात्री आणखी थोडा शोध घेतला असता तर बरे झाले असते असे वाटले.

असो, तिकडे जेवण करून मग आम्ही शेगावहून शिर्डीकरीता प्रस्थान केले.




मे ०२, २००९

गेले २ आठवडे 'गल्लीत गोंधळ.. दिल्लीत मुजरा' ह्या चित्रपटाच्या जाहिराती पाहत होतो. काल हा सिनेमा प्रदर्शित झाला. आज वेळ जमून आल्याने हा सिनेमा पहावयाचे ठरविले. आज सकाळी फोनवरून सिनेमाचे तिकीट काढून ठेवले. वाटले आज शनिवार आहे, त्यात नवीन हिंदी चित्रपट आले नाहीत. म्हणून गर्दी असायची. (मराठी सिनेमाला गर्दी असते हे आता मान्य करण्यासारखे आहे.)



तिकीटखिडकीवर जाता जाता पाहिले ४ पैकी ३ पडद्यांवर मराठी चित्रपट आहेत. अर्थात हिंदी चित्रपट प्रदर्शित न होणे हे ही कारण असू शकेल, पण आनंद वाटला की मराठी सिनेमाला मल्टीप्लेक्स मध्ये पाय पसरायलाही जागा मिळाली. पण प्रेक्षागृहात शिरताक्षणी तो आनंद मावळून गेला. जेमतेम १० ते १५ टक्के खुर्च्या भरल्या होत्या. असो.(बोक्याची टक्केवारीही काढायला पाहिजे असे वाटले. तो सिनेमा बहुधा अजूनही चांगला चालत आहे.)

ह्या सिनेमाची कथा तशी काही वेगळी नाही. (मला चित्रपटाची कथा ऐकायला आणि सांगायला आवडत नाही, पण ह्यात काही खास वळणं नाहीत. चित्रपटाच्या जाहिरातीतच सर्व दिसून येते.) एका गावातील एकमेकांवर कुरघोडी करणारे दोन जण- एक आमदार, एक सरपंच. व त्या दोघांत राहून दोघांचीही कामे करत स्वतःचा फायदा करून घेणारा गावातील एक माणूस नारायण. सुरूवातीपासून आमदार टोपे (सयाजी शिंदे) आणि सरपंच डोळे (नागेश भोसले) ह्यातील एकमेकांवर वरचढ होण्याची भांडणे दाखविली आहेत. त्यात नारायण (मकरंद अनासपुरे) दोघांकडून असल्याचा आव आणत, त्यांच्यात कळ लावत, त्यात भर घालत असतो, व स्वतःचाही फायदा करून घेत असतो. पुढे एका भांडणातून नारायण ठरवितो की तो स्वतःच निवडणूकीला उभा राहणार. मग जे राजकारणी डावपेच सूरू होतात ते सर्व पुढील चित्रपटात दाखवले आहे.

संपूर्ण चित्रपटात विनोदी वातावरण कायम राहते, आणि हा विनोद हा एका पातळीवरच राहतो. ना एकदम घसरला ना एकदम उंचावला आहे. त्यामुळे ठिक आहे. बाकी नारायणाच्या नावावरून विनोद, आमदार टोपेच्या मेव्हण्याचे एकच वाक्य ३/४ म्हणणे अशा प्रकारात थोडा कंटाळा येतो. सुरूवातीला नारायण सायकलवरून उतरल्यावर पायांची जी हालचाल करतो त्यावरून असले अंगविक्षेपाचे विनोद असल्याचे खटकले होते, पण तो प्रकार २ वेळाच दाखवला आहे. एखाद्याशी बोलत असताना आमदाराचा मुलगा मध्ये मध्ये आपले बोलणे लावत असतो ते प्रसंग नेहमीचेच वाटतात पण तरीही हसवून जातात.

वेगळेपण वाटले ते नारायण जे काही करत असतो ते नेमके कशाकरीता करत असतो त्याचा अंदाज लगेच आला नाही. एखादी गोष्ट घडून जातानाच त्यामागचे कारण कळते. उदा. डोळे व टोपे दोघांनाही शेवटच्या दिवशी ४ वाजता निवडणूकीचा अर्ज का भरायला लावतो हे मला तरी लगेच कळले नाही. त्या कार्यालयात ४ वाजल्यानंतरच कळले.

चित्रपटाला तशी एक सलग कथा असल्याचे मला तरी जाणवले नाही. एकमेकांना धूळ चारणे हा मूळ हेतू समोर ठेवून त्यानुसार मग प्रसंग टाकलेले आहेत. सयाजी शिंदे व मकरंद अनासपुरे ह्यांचे काम नेहमीच्याच शैलीत आहे. नागेश भोसलेचा अभिनय मी जास्त पाहिलेला आठवत नाही. काही वर्षांपूर्वी आलेल्या 'हसरतें' मालिकेतील त्याचे काम आवडले होते. पण त्यातील युनियन लीडरचा आवेश ह्यात सरपंच असला तरी वाटला नाही. बाकी इतर पात्रे म्हणजे आमदार/सरपंचाची बायका,मुले ह्यांची ही कामे बरी वाटली. सरपंचाच्या बायकोचा (लग्नाआधीचा) प्रियकर जो महाराज बनून वावरतो त्याचेही काम चांगले वाटले. लावणी कलाकार म्हणून असलेल्या नायिकेचे कामही बरे वाटले. एक परदेशी युवती तेथे कला शिकण्यासाठी आलेली असते त्याची गरजही सुरूवातीला वाटत नाही परंतु नंतर गरज कळते. संपूर्ण चित्रपटात दिल्लीचे नाव नाही. आहे ते फक्त लावणी मध्ये व चित्रपटाच्या शेवटी. नावावरून वाटले होते की गल्लीत म्हणजे स्वतःच्या प्रांतात काही गोष्टी करण्यासाठी दिल्लीमध्ये काही ना काही कथानक घडत असेल. पण सिनेमात नुसता गावातील कुरघोडींचा गोंधळच आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना एवढा काही खास प्रभाव माझ्यावर पडला असे वाटले नाही. त्यातल्या त्यात नंतरच्या १ तासात मी हा सिनेमा पाहिला हे ही विसरून गेलो.

असो, मी ही अजूनही गोंधळलो असल्याने माझे लिखाणही तसेच वाटत असेल. पण ह्या सिनेमाबद्दल मत असे की सिनेमा तसा वाईटही नाही आणि आवर्जून पहावा असाही नाही.

मे ०१, २००९

गेला महिनाभर निवडणूकीबद्दलचे SMS येत होते. "Save Thane","Vote for XXXXX","Don't vote for XXXXX" वगैरे वगैरे. वैताग आला होता त्या SMS चा. तसेच बाकीचे जाहिरातींचे SMS ही होतेच, ज्याला आपण टेलिमार्केटींग म्हणतो त्या प्रकारचे. Do Not Disturb मध्ये नंबर नोंदवूनही हे SMS येत असल्याने तक्रार करण्यास माझ्या मोबाईल कंपनीच्या ग्राहक केंद्राला संपर्क केला. ते म्हणाले, 'पहिल्यांदा तक्रार करताना तुम्हाला लेखी तक्रार द्यावी लागेल" त्यामुळे मला त्यांच्या कार्यालयात जाणे भाग होते. वेळेअभावी ते जमले नाही. आणि निवडणुकीचे SMS म्हटले, तर वाटले ह्याची तक्रार करूनही काही फायदा होणार नाही. आणि एवीतेवी ३० एप्रिल नंतर बंद होतीलच. टेलिमार्केटिंगचे आलेत तर पाहूच.

पण आज SMS आला, "You have voted & every vote will make India Strong................. Thank You"

सर्वांनाच हा SMS गेला असेल तर एक वेळ ठीक आहे. पण ह्या लोकांनी मतदारयादीतूनही मतदान केलेल्या लोकांची नावे घेउन तर नाही ना SMS पाठवले, अशी ही पुसट शंका येऊन गेली. :)

तुम्हाला कोणालाही असे संदेश आले आहेत का?

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter